राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा – नरेंद्र मोदी

13 03 2008

राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा – नरेंद्र मोदी

Shivaji the Idol and ICON for Modern Politician: Modi

मुंबई, ता. १२ – दहशतवाद झपाट्याने वाढत असताना केंद्रातील मनमोहनसिंग सरकार मात्र अतिरेक्‍यांचा बीमोड करण्यात अपयशी ठरत आहे. दहशतवाद्यांविरुद्ध लढण्याची राज्यकर्त्यांची मनापासून इच्छा असेल, तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवावा, असे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. …….
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुन्हा जिवंत करणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे उद्‌घाटन आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरातील पु. ल. देशपांडे अकादमीत हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या वेळी “आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री. श्री रवि शंकर, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, अभिनेते विनोद खन्ना आदी उपस्थित होते.

शिवाजी महाराजांची ओळख आपण स्वराज्यासाठी लढाया लढणारा राजा, अशी मर्यादित केली आहे; पण शिवाजी महाराजांनी मूलभूत विकासासाठी ज्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या त्या आज ३०० वर्षांनंतरही आदर्शवत आहेत. आजच्या राज्यकर्त्यांचे शिवाजी महाराज हे खरेखुरे प्रेरणास्त्रोत असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

देशाच्या संस्कृतीचा तिरस्कार करणाऱ्या विरोधकांनी इतिहासातील वीर पुरुषांना नेहमीच नाकारले. अलेक्‍झांडर, नेपोलियन यांचा इतिहास जरी मोठा असला, तरीही ज्या विशाल भूभागावर शिवाजी महाराज लढले, ज्या बलाढ्य मोगलांना त्यांनी चीत केले, ते पाहता जगातील सर्व लढवय्यांमध्ये महाराजांचे स्थान सर्वोच्च होते, असे प्रतिपादनही मोदी यांनी केले. केवळ इतिहासाची माहिती असून इतिहास समजत नाही, तर इतिहास जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सांगताना मोदी म्हणाले, की शिवाजी महाराजांचा इतिहास भावी पिढीसमोर येण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत.

देशात सर्वप्रथम हिंदुत्वाचा नारा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. शिवाजींसारखा जाणता राजा व योद्धा जगभरात आतापर्यंत कोणीच झाला नाही. युद्धात गनिमी काव्याचे तंत्र प्रथम छत्रपतींनी सुमारे ३०० वर्षांपूर्वी आणले व त्याचा अवलंब नंतर जगभरातील वीर पुरुषांनी केला, असे गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले.

याप्रसंगी रवि शंकर यांनी उपस्थितांना अध्यात्माचे धडे दिले.

लष्कराची अवस्था नाजूक
सियाचीन चेक पोस्टचे संरक्षण करणारे कॅप्टन बना सिंग यांना आज “शिवाजी फॅक्‍ट इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या प्रदर्शनाचे आयोजन “फॅक्‍ट इंडिया’ या संस्थेने केले आहे. देशातील दहशतवाद फार वाढतोय; पण राज्यकर्त्यांना याची बिलकूल पर्वा नाही. सीमेवर शत्रूंशी प्राणपणाने लढणाऱ्या लष्कराची अवस्था आज नाजूक झाली आहे. ११७३ कमांडरनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला, तर ७५५० बीएसएफ व सीआरएफचे जवान गेल्या काही दिवसांत लष्कर सोडून गेले. आजही लष्करात सुमारे ११ हजार जवानांच्या जागा रिक्त आहेत. लष्कराची अवस्था अशी असेल, तर देश कसा सुरक्षित राहील, असा सवाल निवृत्त कॅप्टन बीना सिंग यांनी केला.

http://www.esakal.com